Posted on

24th Feb: देव अंतःकरण उघडतो

तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे;
ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे उघडलें
की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.(प्रेषितांची कृत्ये 16:14)


ज्यां ज्यां ठिकाणी पौलाने सुवार्ता गाजविली तेथे काहींनी विश्वास ठेवला आणि काहींनी नाही.
आम्ही हे कसे समजावे की अपराध आणि पातकांत मृत असलेल्या काही लोकांनी विश्वास ठेवला
आणि काहींनी नाही (इफिस 2:1,5)?


काहींनी विश्वास का ठेवला नाही याचे उत्तर हे आहे की “त्यांनी त्याचा अव्हेर केला” (प्रेषितांची
कृत्ये 13:46) कारण सुवार्तेच्या गोष्टीं त्यांना “मूर्खपणाच्या वाटतात” आणि त्यांना “त्या समजू
शकणार नाहीत” (1 करिंथ 2:14). देहस्वभाव “हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या
नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही” (रोम 8:7).


प्रत्येक जण जो सुवार्ता ऐकतो आणि त्याचा अव्हेर करतो “तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि
आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही” (योहान 3:20). त्यांची “बुद्धी
अंधकारमय झाली आहे… त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न
होऊन” राहते (इफिस 4:18). हे सदोष अज्ञान आहे. सत्य तर प्रकट आहे, पण ते “अनीतिने सत्य
दाबून ठेवतात” (रोम 1:18).


पण मग, जरी सर्व जण अंतःकरणाच्या या बंडखोर कठीणपणाच्या दशेत आहेत, व आपल्या
अपराधांत मेलेले आहेत तरी काही लोक विश्वास का ठेवतात? प्रेषितांच्या कृत्यांचे पुस्तक
कमीत कमी तीन वेगळ्या पद्धतीने याचे उत्तर देते. एक हे आहे की त्यांना विश्वास ठेवण्यासाठी

नेमण्यात आले आहे. जेव्हा पौलाने अंत्युखियातील पिसिदिया येथे सुवार्ता गाजविली, तेव्हा
परराष्ट्रीय आंनदीत झाले आणि “जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी
विश्वास ठेवला” (प्रेषितांचे कृत्ये 13:48).


काही लोक विश्वास का ठेवतात याचे आणखी एक उत्तर असें की देवाने त्यांना पश्चातापबुद्धी
दिली. जेव्हा यरूशलेमातील पवित्र जनांनी हे ऐकले की यहूदीच नव्हे तर परराष्ट्रीयदेखील
सुवार्तेस प्रतिसाद देत होते, तेव्हा ते म्हणाले, “देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून
पश्चातापबुद्धी दिली आहे” (प्रेषितांचे कृत्ये 11:18).


परंतु व्यक्ती सुवार्तेवर विश्वास का ठेवतो या प्रश्नाचे प्रेषितांच्या कृत्यामधील सर्वात स्पष्ट उत्तर हे
आहे की देव अंतःकरण उघडतो. लुदिया याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. तिने का विश्वास
ठेवला? प्रेषितांची कृत्ये 16:14 म्हणते, “तिचे अंतःकरण प्रभूने असे उघडलें की पौलाच्या
सांगण्याकडे तिने लक्ष दिले.”

जर तुम्ही येशूवर विश्वासणारे असाल, तर या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडल्या आहेत : तुम्हाला
विश्वास ठेवण्यासाठी नेमण्यात आले होते; तुम्हाला पश्चातापबुद्धी देण्यात आली होती; आणि
देवाने तुमचे अंतःकरण उघडले होते. तुमचे उर्वरित जीवन तुम्ही विश्वासणारे आहात या
चमत्काराप्रत अद्भुत कृतज्ञतेने ओतप्रोत असले पाहिजे.

Leave a Reply